पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 47 - श्रावणी बर्गे
स्पर्धक क्रमांक 47
सौ. श्रावणी रोहित बर्गे.
सातारा.
Gmail -9403826530p@gmail.com
प्रिय विद्यार्थीमित्रांनो,*
खूप दिवसांपासून बोलायचे होते तुमच्याशी. आज बोलतेच. कसे आहात? सुट्टी म्हणून मजेत ना? अभ्यास करताय ना? शाळेची, आमची आठवण आली की नाही? मला मात्र तुमची खूप आठवण येत होती. शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय ऐकून आता तुमची भेट होणार म्हणून आनंद होत होता;पण त्याचबरोबर तुमच्या चिंतेने काळीज पोखरून निघत होते. एवढी काळजी घेऊनही काही अनुचित प्रकार घडणार नाही ना? अशी शंकेची पाल चुकचुकली आणि मन सैरभैर झाले. तसे गेले आठ महिने ते थाऱ्यावर आहेच कुठे?
लॉकडाऊन घोषित झाले आणि शाळेला कुलूप लागले. आता अभ्यासातून सुट्टी म्हणून, जसा तुम्हाला आनंद झाला तसाच काही दिवस व्यापातून सुट्टी म्हणून आम्हालाही झालाच. पण किती दिवस? सुरुवातीचे काही दिवस अगदी मजेत गेले; पण नंतर मात्र शाळा खुणावू लागली.कोणी काहीही म्हणो; पण ज्ञानदानाचा वसा घेतलेल्या आम्हास नाही रे कल्पना करवत तुमच्याशिवाय एवढे दिवस राहण्याची! तुमचे निरागस चेहरे आठवू लागले , की मन नकळत शाळेत फिरून येते. गेले कित्येक दिवस तुमच्या पाठीवरून हात फिरवला नाही, की तुमच्या डोक्यावर गमतीने टपली मारली नाही. तुमच्या चेहऱ्यावरील निर्भेळ हास्य पाहायला डोळे व्याकुळ झालेत. " मॅडम, आज गोष्ट सांगा ना, खेळायला मैदानावर न्या, कविता छान म्हणता तुम्ही.. छानशी चाल लावा ना.. !असा प्रेमळ हट्ट ऐकलाच नाही कित्येक महिने. तुमची भांडणं, हळूच खोड्या काढणे आणि पळून जाणे, तुमचा वर्गातील दंगा सगळेच आठवते आणि मन खिन्न होते. तुम्ही प्रेमाने दिलेला गुलाब आठवतो." मॅडम ,आज छान दिसत आहात " असे तुमच्यासारखे मनापासून आणि नि:स्वार्थी कौतुक खरंच कोणी करत नाही बाळांनो!
ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याने जरा हायसे वाटले. प्रत्यक्षात नसली तरी भेट होणार म्हणून मन आनंदले. खूप दिवसांनी जेव्हा स्क्रीनवर तुमचे हसरे चेहरे दिसले, तेव्हा नवे चैतन्य निर्माण झाले पुन्हा एकदा.हरवलेले काहीतरी गवसल्याचा आनंद झाला होता.तुमचा गोंधळ ऐकून पुन्हा वर्ग भरल्यासारखे वाटले. पण साऱ्यांनाच हा ऑनलाईन वर्ग कुठे परवडतो? माझ्या ' त्या ' बाळांची अनुपस्थिती खटकत होतीच मनाला. त्यांचे होणारे नुकसान नव्हते बघवत. कदाचित म्हणूनच की काय शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असावा शासनाचा.
शाळा, वर्ग निर्जीव असतात ; पण तुम्ही तुमच्या बागडण्याने त्यांना सजीव बनवता. ती शाळाही जणू तुमची वाट पाहत होती. तुमच्या स्वागतासाठी स्वच्छ होऊन ती तयार झालीय.आता तुमची जबाबदारी आहे सर्व नियम पाळण्याची. तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे बाळांनो! ' माझे आरोग्य , माझी जबाबदारी!' हे ब्रीद मनी ठसवा आणि शाळेत या. आम्ही सर्व तुमची वाट पाहतोय. लवकर ही महामारी संपावी आणि पन्नास टक्के नव्हे तर तुम्हा सर्वांच्या दंग्याने शाळेचा हा परिसर पुनश्च दणाणून जावा, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
भेटण्यास आतुर,
एक शिक्षिका .
सौ . श्रावणी रोहित बर्गे.✍️
सातारा.
अप्रतिम पत्रलेखन
उत्तर द्याहटवा