पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 35 -स्मिता माने
स्पर्धक क्रमांक 35
नाव:-स्मिता शिवाजी माने
इन्स्टा:- @smith_lekhani
इमेल:-smitamane5983@gmail.com
प्रिय , आई बाबा
सा. न. वि. वि
पत्र लिहिण्यास कारण असे काही खास नाही, पण मनात उटलेले विचारांचे काहूर शांत होत नाही, म्हणून हे पत्र लिहायला बसले काही चुकले तर माफ करा. मी मनातले सांगायला सुरुवात करते.
आई तुला आठवते का गं? मी जेम तेम पाच, सहा वर्षांची असेल, तेव्हा घडलेली ती घटना अजूनही मला जशीच्या तशी आठवते. आपण आपल्या शेतात गेलो होतो आणि भांगलायचे चालले होते, उसाच्या लागणीत. तु ज्या सरीत बसली होती ते खुरपे घेऊन मी धाऊ लागले, काय गं ते वय माझे काहीही समजत नव्हते, म्हणून पळत सुटले, आणि तू काय केलेस माझ्या पाटी धावायचे सोडून ज्या जाग्यावर उभी होतीस तिथून सरळ नेम धरलास आणि दगड माझ्या दिशेने फेकलास. तो दगड माझ्या डोक्यात लागला रक्त पण येऊ लागले, तरी तू मला जवळ सुद्धा घेतले नाहीस, त्या मुळे काय झाले माहीत आहे का? त्या मुळे तुझ्या बद्दलचे माझ्या मनातले प्रेम कमी झाले. असो तुला अपराधी मुळीच नाही समजत उलट हेच माझ्या नशीबात होते असे म्हणून विसरू पाहते, पण बालमनावर झालेला आघात मनात घर करून बसला आहे.
मला कधी कधी वाटते तुम्ही माझे आई वडीलच आहात ना? हा प्रश्न पडावा इतके कोणाचे दूर भाग्य नसावे.
पप्पा तुमच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर सन्मान आहे. जे आईने कधी शिकवले नाही ते तुम्ही ओरडून का होईना शिकवले, जे आईने करायला हवे होते ते तुम्ही केले जेवण बनवायला शिकवले,येईल तसे कर पण कर हे तुम्ही सांगितले. या गोष्टीचा अभिमान वाटतो कुठे तरी.
पण एक गोष्ट अशी घडली ज्या मुळे तुम्ही पण माझे नाही वाटू लागले. अकरावीत असताना मी जेव्हा घाई गडबडीत पाणी पित होते. तेव्हा तुमचा चुकून माकून धक्का लागला. आणि माझ्या हातात असलेला पाण्याचा ग्लास डोळ्याच्या जरा वर भोवळीला जावून चिकटला. एक दोन मिनिटे काही समजले नाही पण जेव्हा चेहरा रक्ताने माखून गेला तेव्हा माझे काळीज चटकन पिळवटून गेले. मला बोलता ही येत नव्हते की रडता येत होते. मी त्याच धक्यात गेले. जीवारी काय लागले माहिती आहे का? तुम्ही एकदा ही पाहिले नाही आणि तसेच निघून गेलात, आई जरा तरी मुलगी म्हणून पाहू लागली तिनेच दादा ला गाडी काडून पटकन दवाखान्यात नेले, डाॅक्टरने चार टाके मारले, घरी आले तरी तुम्ही साधे विचारपूस पण नाही केली कसे वाटले असेल मला?
आता रोज आरश्यात बघताना चेहऱ्यावर एक डागही नसलेली मी जेव्हा तो निशान बघते तेव्हा आरश्यात बघू वाटत नाही. ते जरी चुकून घडले असले तरी तुम्ही विचारले च नाही हे मनाला डागनी देते, असो तरीही मी हसून विसरून जाते, देवाने हे लिहून ठेवले असावे म्हणून विसरून जाते.
बाकी काही बोलू तुमच्या बद्दल असे प्रेमळपणे बोललेले आठवतच नाही मला. माझी किती साधी इच्छा आहे, आपण सगळे एकत्र बसून जेवण करू, मला आठवत सुद्धा नाही आपण एकत्र पणे कधी जेवलो. घरात सुख, समाधान, शांती असेल ना तर काही वाटत नाही त्या वातावरणात राहायला मग भले ही तो तुमचा बंगला असो किंवा साधी झोपडी आनंद नांदला असता, तुम्हाला सांगू का जीव तुटतो माझा सतत तुम्ही कधी तरी मला घट्ट मिठीत घ्याल प्रेमाने कुरवाळत बसाल पण हे फक्त स्वप्नातच दिसते मला. आई मला ना रात्री झोपताना पहिल्या पासून तुझ्या खुशीत झोपायची इच्छा असायची, पण ती ही तुला आवडत नसे मी तुला मिठी मारली की तू मला दूर लोटायची खूप वाईट वाटायचं.
मग उगाच आज्जी जवळ झोपायचे आणि तिच्या जवळ झोपायची सवय लागली, तिच जवळची वाटू लागली. हा ओरडे खूप पण प्रेम पण तेवढेच करते माहीत आहे पण कधी बोलून दाखवत नाही. आता ना मला माणसापेक्षा मुके प्राणी जास्त जवळचे वाटतात, त्यांना बोलता येत नाही पण जीव इतका लावतात की तो तुम्ही सुद्धा कधी लावला नाही. जे त्यांना कळते ते तुम्हांला कळू नये ऐवढे कोणाचे नशीब खराब नसावे.
आता मी माझी लेखणी, माझे मनी माऊ, आणि आॅनलाईन दुनियेत भेटलेली काही जीवलग मला आपलेसे वाटतात. आता नाही मी एकांती राहणार आता मी माझे जीवन हसत हसत जगणार.आणि नक्कीच काही तरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. स्वतः ची नवी ओळख, एक नवी जिद्द, इच्छा, आकांक्षा पूर्ण करेन. एक दिवस तुम्हालाच असे वाटेल आपण आपली मुलगी म्हणून मला कधी जीव लावला नाही तीच तुमच्या म्हातारपणाची काटी होईल, तेव्हा तुमचे डोळे पाणवतील, दुख ही खूप होईल, आणि तेव्हा जो आनंद होईल तो शब्दात सांगता येणार नाही. त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत राहीन.
तुम्ही आहात सोबतीला मात्र कधीच माझे नाही होऊ शकला ही खंत असेल कायम या अंतर मनी.
असो तरीही तक्रार काहीही नाही माझी,
पत्र पण खूप लांबत आहे. थांबते आता जरा भावनेच्या भरात जास्त बोलले माफ करा पण मला नाही वाटत मी काही चुकीचे बोलले.
देव करो आणि तुम्हाला माझे आयुष्य लाभो. तुम्ही कसे पण वागला तरी मी तसा विचार पण नाही करू शकत. जन्मदाते आहात तुम्ही त्याची जान आहे मला. आनंदी रहा, खूप खुश रहा आणि काळजी घ्या.
तुमचीच,
स्मिता✍🏻
निशब्द करुन टाकणारे पत्र.. खुप छान
उत्तर द्याहटवा☺thank you sir
हटवाKhup chaan lihle smitudi, डोळे पाणावले
उत्तर द्याहटवाThank you ☺🙌
हटवाSmita tai sunder✍👌
उत्तर द्याहटवाThank you ☺🙌
हटवा