पत्रलेखन स्पर्धक क्रमांक -30 पूजा नागरहळ्ळी

 * महाराष्ट्र कवी मंच अंतर्गत पत्रलेखन स्पर्धा २०२०  *

स्पर्धक क्रमांक -30

स्पर्धकाचे नाव - पूजा नागरहळ्ळी 

स्पर्धकाचे शहर  -  बारामती, महाराष्ट्र 

इंस्टाग्राम  पान  -  @its.pure_soul 

ई-मेल - nagarhallipooja95@gmail.com



विषय - लेखणीस कृतज्ञतापूर्वक पत्र. 


कु. पूजा नागरहळ्ळी

बारामती, महाराष्ट्र 

१०/ ११ /२०२०


प्रिय लेखणी,

             

             कशी आहेस गं? खरंतर तुझ्यामुळे माझे अस्तित्व बनले आहे. पण मी कधी तुझी विचारपूसही केली नाही. मी म्हणेल तसं चालते, मी म्हणेल तसं लिहितेस. तुझ्याबद्दल असलेली कृतज्ञता कशी व्यक्त करावी तेच समजत नाही बघ. आज म्हटलं पत्राद्वारे तरी तुझ्याशी संवाद साधावा.... 


           बाबांनी जेव्हा तुला माझ्या हातात दिले ना, तेव्हा मला फार फार आनंद झाला होता. तू दिसायला अगदी सुडौल, आकर्षक आणि सुंदर दिसत होतीस. तू माझी सर्वात आवडती आणि लाडाची लेखणी आहेस बघ. आत्तापर्यंतचा प्रवास तुझ्यामुळे शक्य झाला. नवोदित लेखिकेपासून ते प्रगल्भ लेखिकेपर्यंतचा अतिशय सुंदर टप्पा गाठण्यास तुझा अत्यंत मोलाचा वाटा आहे. 

    

          कधी काल्पनिक तर कधी वास्तविकतेचे सुंदर वर्णन तुझ्याकडून घडते. मी कधी मातीशी जोडण्याचा प्रयत्न करते तर कधी उंच - उंच आभाळात उडणाऱ्या पक्षांना तुझ्यासवे गवसणी घालते. फूल - तारे, चंद्र- चांदण्या अशा अनेकानेक सौंदर्याच्या उपमा देत आपण दोघीही एखाद्या कवितेत रंगून जातो. कधी माझ्या सुखात आनंद दर्शवितेस तर कधी दुखा:चे मार्मिक वर्णन करतेस. कधी राग आला तर चिडून प्रखरपणे बोलतेस आणि कधी तितक्याच मायेने गिरवतेस. कधी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासाठी प्रेमकविता करतेस तर कधी विरहातील क्षणही टिपतेस. कधी सौंदर्यपूर्ण शृंगार करतेस तर कधी अलगद लाजतेस. उपमा, अलंकार, शृंगार, प्रेम, विरह अशा अनेक साथीदारांना सोबत घेऊन माझी साथ देतेस. कसं जमतं गं तुला इतकं सगळं...? आणि ते ही निस्वार्थीपणे...? 


             तुला हातात घेतले ना कि आपोआपच लिहायला सुचते बघ. तु कधी तक्रार करत नाहीस की साथ सोडत नाहीस. तुझ्यामुळे मी समाजात एक उत्तम लेखिका, एक उत्तम कवयित्री म्हणून ह्क्काने मिरवते. पण याचं सगळं श्रेय तुला जातं. तुझ्याकडे लेखनक्षमता आहे आणि माझ्याकडे विचारशक्ती. पण आपण दोघीही एकमेकींशिवाय अपूर्णच आहोत. जेव्हा दोघी सोबत येतो, तेव्हाच एक उत्तम लेख अथवा कविता निर्माण होऊ शकते. मग देशील ना गं अशीच आयुष्यभर माझी साथ...? लेखणी बाई तुला मनापासून खूप खूप धन्यवाद गं. मी कायम तुझ्या ऋणात राहीन. आणि समाजासाठी उत्तमोत्तम लिखाण करुन तुझे ऋण फेडत राहीन. अशीच बारीक रहा गं बाई. नाहीतर माझ्या हातात मावणार नाहीस. असो. थांबते गं इथेच. भेटू लगेच एका नवीन कवितेसोबत, एका नवीन लिखाणासोबत...!!!


             " चंद्र माझा एकटा 

             मी त्या चंद्राची चांदणी

               रात्र माझी सोबती

            बोलणी माझी लेखणी " 



                                        तुझीच प्रिय सखी, 

                                        शब्दवेडी लेखिका.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट