पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 21- अविनाश चिंचवडकर
स्पर्धक क्रमांक -21
नाव : अविनाश चिंचवडकर
इंस्टा आयडी : avinashchinchwadkar
शहर : बंगलोर
ईमेल : avinashsc@yahoo.com
शंभुराजेंना पत्र !
श्री. शंभूराजे,
मानाचा मुजरा, प्रणाम ! खरंतर तुम्हाला पत्र लिहावे असे यापूर्वी कधी वाटले नाही. पण तुमच्या आयुष्यावरील “स्वराज्य रक्षक संभाजी महाराज” ही मालिका बघितली आणि तुम्हाला विचारावे असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झालेत !
खरंच काय गरज होती महाराज तुम्हाला तरुण वयात हसतहसत आपले आयुष्य पणाला लावण्याची? कुणी सांगितले तुम्हाला त्या औरंगजेबाने दिलेल्या मरणयातना सहन करण्याची ? कुणी तुम्हाला हक्क दिला होता प्राणप्रिय येसूबाई आणि लहानग्या शाहूला अनाथ करण्याचा ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणासाठी केला तुम्ही हा त्याग? जर तुम्ही हा त्याग महाराष्ट्रातील भावी पिढीसाठी केला असेल तर अत्यंत खेदाने म्हणावे लागेल की तुम्ही साफ चुकलात !
तुम्ही त्या पिढीसाठी प्राणाची आहुती दिली, जी तुमच्या पराक्रमाची भव्यदिव्य कहाणी पहाण्याऐवजी त्याचवेळेस सुरु असलेल्या “चला हवा येऊ द्या” सारख्या तद्दन भिकारड्या मालिकेला अधिक पसंती देते? तुमच्या पराक्रमाचे पोवाडे गाण्यापेक्षा साडी घातलेल्या पुरुषांचे भिकारडे चाळे पाहण्यात धन्यता मानते? झी मराठीच्या वार्षिक कार्यक्रमात तुमच्या पराक्रमाची अस्सल, झळाळती गाथा सांगण्याऐवजी विकाऊ मालिकांना मिळणारी भरमसाठ पारितोषिके मिळतानाही ज्यांचे रक्त उसळत नाही, त्या पिढीसाठी?
कशासाठी केलेत हे बलिदान महाराज ? बाकी तुम्हाला तरी काय माहिती ही पुढची पिढी तुमच्या पराक्रमाची मशाल पेटती ठेवण्याऐवजी तुमच्या नावाने दंगली करण्यात धन्यता मानणार आहे? तुम्हाला कुठल्या जातीच्या व्यक्तीने गद्दारी करून पकडून दिले यावरून जातीपातीचे राजकारण करणार आहे? तुम्ही केलेल्या अतुलनीय त्याग, तुम्ही दाखविलेले अतुलनीय धैर्य विसरून तुम्ही कुठल्या जातीचे प्रतिनिधित्व करता यासारखे क्षुद्र वाद घालण्यात धन्यता मानणार आहे ! तुमच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठीच होणार आहे?
त्यामानाने ज्येष्ठ शिवराज तरी भाग्यवान म्हणायला हवे! शिवराजांच्या पराक्रमाचे पोवाडे अजूनही घराघरात गायल्या जातात ! त्यांच्या अविस्मरणीय शौर्याच्या कथा पाठ्यपुस्तकातून लहान मुलांपर्यंत पोहोचवल्या जातात. अर्थात त्यांचे नाव वापरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजून घेतली आणि अनेक निवडणुका जिंकल्यात ! महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात शिवरायांचे पुतळे उभारले गेलेत. त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली, अनेक नाटके/चित्रपट निघालेत ! स्वराज्याची स्थापना करणाऱ्या या महा पराक्रमी राजाचा महाराष्ट्राने यथोचित गौरव केला ही खरंच समाधानाची बाब आहे!
पण दुर्दैवाने त्याच शिवरायांच्या तेवढ्याच पराक्रमी पुत्राला मात्र महाराष्ट्र विसरला ! ज्या शिवपुत्राने शिवरायांचा वसा प्राणपणाने जपला, ज्याच्या पराक्रमाने औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या नाकी नऊ आणले, ज्याने सिद्धी जोहरचा पराभव करून साक्षात औरंजेबाला दख्खनमध्ये येण्यास भाग पाडले, स्वतःच्या नातेवाईकाला सुद्धा तत्वाशी तडजोड करून वतन दिले नाही आणि शेवटी फंदफितुरीमुळे औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतरही, ज्याने अपरंपार यातना सहन केल्यात पण शरणागती पत्करली नाही, त्या शंभूराजांचे स्मारक मात्र महाराष्ट्रात अभावानेच आढळते ! त्यांच्या त्या बलिदान दिनी ना कुठे शासकीय मानवंदना ना सुट्टी ! खादीचे कपडे घालून वर्षानुवर्षे सत्तेला चिटकून राहणाऱ्या राजकारण्यांचे येथे सोहळे होतात, पण डोळे काढलेल्या, जीभ छाटलेल्या अवस्थेतही मान खाली न होऊ देणाऱ्या या पराक्रमी वीराचे अतुलनीय बलिदान सगळ्यांनी विसरावे?
तुमचे चुकलेच शंभू महाराज ! तुम्ही खरं तर भारताऐवजी इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, अमेरिकेत जन्माला आला असतात तर त्यांनी तुमच्या प्रतिमेला खांद्यावर घेऊन मिरविले असते ! तुमची प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक खूण जपून त्याचे संग्रहालय काढले असते! तुमची तुलना नेपोलियन सारख्या शूरवीराशी झाली असती ! तुमचा इतिहास, तुमचे जिथे जिथे पाऊल पडले ती भूमी त्यांनी पवित्र तीर्थक्षेत्रा सारखी जपली असती !
पण दुर्दैवाने तुम्ही जन्म घेतला तो दख्खनमध्ये ! ज्या भूमीवर शूरवीर, पराक्रमी, प्रसंगी प्राणाची बाजी लावणारे शूरवीर जन्मलेत पण त्याच भूमीवर केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी पराक्रमी सूर्यालाही ग्रहण लावणारे सूर्याजी पिसाळ सारखे फितुरही जन्मले होते ! रयतेसाठी प्राण पणाला लावण्याची शिवरायांची परंपरा तुम्हीही जपलीत, पण दुर्दैवाने त्या गोष्टी जनतेसमोर आल्याचं नाहीत ! याउलट तुमच्या चारित्र्यावर चिखलफेक करून तुम्ही महाराजांची मान खाली कशी घातली, हे सिद्ध करण्याची स्पर्धाच येथल्या नतद्रष्ट इतिहासकारांमध्ये लागली ! तुमच्या विलासी पणाच्या कपोलकल्पित कथाच जगासमोर आणण्यात आल्यात ! सूर्यासारख्या पराक्रमी राजाला सुद्धा आपली महानता सिद्ध करण्याची वेळ आली ! नाही म्हणायला “छावा” सारखी एखादी कादंबरी किंवा एखादे नाटक तुमच्या जीवनावर लिहिण्यात आले, पण अगदी अभावानेच !
या देशासाठी अपरिमित त्याग करूनही उपेक्षित राहणारे तुम्ही एकटेच नाहीत ! अनेक शूरवीरांची आम्ही या आधीही उपेक्षा केली आहे. ज्यांनी २५ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आणि ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले, ते स्वा. सावरकर, त्यांचा त्याग आम्ही जातीपातीच्या राजकारणात साफ विसरलो !
तुमच्या महानिर्वाणानंतर या देशाची काय परिस्थिती झाली हे तुम्ही वरून बघितले असेलच ! मराठ्यांच्या आणि पेशव्याच्या अनेक झुंजार पिढ्या येऊनही शेवटी टोपीकरांनी हा संपूर्ण प्रदेश गिळंकृत केला ! तुमच्या प्रिय येसूबाई आणि शाहूराजांना तर तब्बल तीस वर्षे मुघलांच्या कैदेत राहावे लागले! स्वतःच्या कुटुंबीयांची अशी वाताहत करून तुम्ही काय साध्य केलेत? आणि कशासाठी केलेत हे?
तुम्हाला हिंदवी स्वराज्य राखायचे, तुम्हाला परक्यांची गुलामी नको होती, हे उज्ज्वल ध्येय तुमच्यासमोर होते ! पण ज्या पिढीला सकाळी उठल्यापासूनच परदेशाची स्वप्ने पडतात , जी पिढी लवकरात लवकर हा दरिद्री देश सोडून परदेशी जाऊन परकियांची चाकरी कशी करायची याचाच विचार करते, त्यांना तुमच्या या निष्ठेची, त्यागाची कहाणी सांगून काय करणार ? ज्या देशातील भावी पिढीने आपले स्वत्व गमावून परदेशाचे अनुकरण करण्यातच धन्यता मानली आहे, त्यांना काय कळणार की भर तरुणवयात दख्खनचे पठार घोड्यावरून पिंजारून तेजस्वी मावळ्यांची फौज तुम्ही कशी उभी केलीत?! खरंतर तुम्ही आणि तुमच्या सारखे शूरवीरांच्या कथा 4D चित्रपटात पॉपकॉर्न खाताखाता बघायलाच आम्हाला आवडतात, पण आपल्या आयुष्याशी याचा काही प्रत्यक्ष संबंध आहे, याची आम्हाला जाणीवही नाही !
तर या पत्राचा प्रपंचच आहे की, जमल्यास सध्याच्या पिढीच्या वतीने तुमची माफी मागावी ! तुम्हाला सांगावे की महाराज, तुम्ही केलेल्या महान बलिदानाची जाण अजूनही काही लोकांना तरी आहे ! तुम्ही ३०० वर्षांपूर्वी पेटवलेल्या वणव्याची धग अजूनही जिवंत आहे ! कुणास ठाऊक या राखेतूनही पुन्हा एखादा शिवपुत्र जन्म घेईल आणि या स्वत्व विसरलेल्या भूमीस पुन्हा एकदा स्वाभिमान, देशभक्तीचे धडे देईल !
-- त्याच दिवसाची वाट बघत !
आपलाच,
एक शंभूभक्त
-------------------------------------------------x------------------------------------------------------------------
अविनाश चिंचवडकर
पत्ता -
206, Saideep Habitat,
II Main, New Thippasandra
Bangalore - 560075
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा