पत्रलेखन स्पर्धक क्रमांक : १२ - विनोद अशोक उमरतकर



 स्पर्धक क्रमांक : १२

*नाम: विनोद अशोक उमरतकर 

*इंस्टा आयडी :- @umratkar_vinod         

 *शहर :- कळंब जिल्हा यवतमाळ

*इमेलआयडी :-umratkarvinod@gmail.com




प्रिय दारू,

             सा.न.वि.वि.

        पत्रास कारण की,आजपर्यंत मला, तुझे कधी महत्व कळलेच नाही,आणि तशीही तुझी माझी दुष्मनी जगजाहीर आहेच(मला ओळखत असणाऱ्या पुरते माझं जग)पण या कोरोनाच्या काळात मला तुझे असलेले अनन्य साधारण महत्व खूप चांगलं पटले,आणि माझ्या मनाला भावले पण , त्यासाठीच हा पत्रप्रपंच.


       खरंतर कोरोना येईपर्यंत मी तुला खूप तुच्छ नजरेने पाहत होतो,पण जेव्हा शाळा,वाचनालय,व्यायामशाळा आणि मंदिरापूर्वी तुझी दुकाने उघडली तेव्हा तुझे महत्व माझ्यासाठी ठोकळ रेषेत अधोरेखित झाले.एकीकडे अर्थव्यवस्थेचा कणा असणारी तू आणि दुसरीकडे दारूबंदीसाठी प्रयत्नशील असणारे कार्यकर्ते,तुम्हा दोघात माझी फार फसगत होत आहे,नक्की कुणाची बाजू घ्यावी हे माझेच ठरत नव्हते आणि आजही तसे ठरले नाही. असो,

             माझ्या सर्व दारुड्या मित्राना हवीहवीशी वाटणारी तू, माझ्या इतके लांब का राहतेस? हा प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरित आहे.

              खरंतर तुझ्या नशेत झिंगण्याची माझी खूप इच्छा आहे पण ती इच्छा कधी पूर्ण होईल असे मला वाटतं नाही,कारण जेव्हा जेव्हा तुझी मला वाईट बाजू पण कळत आहे तस तशी तुझ्या माझ्यात खूप मोठी दरी निर्माण होत आहे, तुला चांगले म्हणावं की वाईट या द्विधा मनस्थितीत मी सध्या वावरत आहे.

              मी असे ऐकलं आहे की तुझ्या सेवनाने माणूस हा कधीच म्हातारा होत नाही कारण तो म्हातारा होण्यापूर्वीच मरतो ,यात म्हातारपण चांगले की लवकर मरणे चांगले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.तुझे जेव्हढे विरोधक आहे ना ! त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तुझे समर्थक आहे. नक्कीच तुझ्यात काही तरी चांगले असायला हवे ,उगीच का ? समर्थकांचा गोतावळा तुझ्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

             तुझ्या विरोधातले मोर्चे, आंदोलन माझ्यासाठी समर्थनीय आहेच पण तुझ्या समर्थनार्थ निघालेले मोर्चे, आंदोलन माझ्यासाठी अनाकलनीय आहे,पण मला सांग तुला नक्की काय मिळते ग ? असे लोकांचे सुखाचे संसार उध्वस्त करून , काहीतरी मिळत असेल तर, नक्कीच मला सांग, म्हणजे जेणेकरून मला पण तुझ्या समर्थनात उभा राहता येईल.


           तुझ्याशी मनातलं बोलण्याची आज पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्याचा मला खूप आनंद आहे तशी वेळ आल्यास भेटूच (तशी वेळ कधीही न येवो यासाठी मी प्रयत्नशील राहील) काही चुकले असेल तर माफ कर,

सर्वांची काळजी घे, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाना दीर्घायुष्य दे, त्यांचे लिव्हर सुरक्षित ठेव, आणि त्यांना शक्ती दे स्वतःला आणि तुला सांभाळन्याची 

          तसा लोभ नाहीच! पण तरीही कळावे लोभ असावा 


                                                            तुझाच 

                                                         एक विरोधक

टिप्पण्या

  1. खूपच छान,काल्पनिक पात्र पण समाज प्रबोधनात्मक

    उत्तर द्याहटवा
  2. तुम्ही जे ही लिहिता ते अगदी मनापासून असत

    उत्तर द्याहटवा
  3. मराठी भाषेतील लवचिकता व लेखन👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. You very skillfully serve bilateral liquor. It is very good satire and eye opener. Please keep writing and sharing.
    Thank you!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट